About My Village

माझे गाव (About My Village)

नावाविषयी माहितीः महाभारतातील कालखंडामध्ये पांडव वनवासात असताना विश्रांतीसाठीआमच्या गावी थांबल्यामुळे ‘अवसर’ (थकवा घालविण्याचे ठिकाण) हे नाव पडले. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभाराच्या निमित्ताने प्रवास करीत असताना पूर्व इतिहासानुसार पांडवकालीन परंपरेचा वारसा जपण्याकरीता ‘अवसर’ घेण्यासाठी आमच्या गावी थांबत. ‘अवसर’ आणि शेतसारा जास्ती असल्यामुळे बुजुर्ग (थोरले) या दोन्ही शब्दांचा अपभ्रंश होऊन ‘अवसरी बुद्रुक’असे नामकरण झाले. गावात पांडवकालीन विहिरी आहे. डोंगरावर प्रभू रामचंद्र यांच्या धर्मपत्नी सीतामाई यांच्या न्हाणीचे काही अवशेष उपलब्ध आहे अशी कथा सांगीतली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात यवनांच्या बेबंदशाहीपासून रयतेचे राज्य निर्माण करुन संरक्षणासाठी चाकण या भुईकोट किल्यापासून शिवनेरी या ठिकाणी जाणारा भुयारी मार्ग अवसरी बुद्रुक या गावातून जात आहे. त्या मार्गाचे अवशेष आजही पहावयास मिळतात.

इतिहासः पुणे – नाशिक महामार्गावरील मंचरपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर अवसरी बुद्रुक गाव वसलेले आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या अवसरी बुद्रुकच्या  दक्षिणेला डोंगरांची रांग तर पूर्वेला गण्या डोंगर आहे. गावात जुने रहिवासी हिंगे कुटुंबीय आहेत. त्यांच्याकडेच ग़ावची पाटीलकी होती. या पाटीलकीलाही इतिहास आहे. साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र इस्लामी राजवटी होत्या. सर्वत्र अनागोंदी माजली होती. बहुतेक किंबहुना सर्वच शूरवीर मराठा सरदार यवनांची चाकरी करण्यात समाधान मानत होते. त्याचवेळी वेरुळचे भोसले घराणे आपल्या पराक्रमाने पुढे आले. त्यांनी आपल्या पराक्रमाने इस्लामी राजवटीतही दबदबा निर्माण केला. याच काळत केंदूरचे गावडे घराणे नावारुपाला येत होते. शौर्य आणि पराक्रमाबद्दल गावडे घराण्याला चिचवडगाव, डेक्कन जवळील पुलाची वाडी, फाकटे, भराडी, पूर यासह ९ गावे इनाम देण्यात आली. अवसरी हे गाव हिंगे आणि गावडे यांना विभागून दिले होते. बक्षिसपत्रांची सनद घेऊन गावडे घराण्याने सनई चौघडा रणशिंगासह आपली माणसे रवाना केली. मात्र, अवसरीचा ताबा घेण्यास उशीर झाला. तोपर्यंत हिंगे पाटलांनी अवसरीच्या गावठाणात पाटिलकीची आणि बक्षिसांची द्वाही फिरवली होती. ताबा घेण्यावरुन संघर्ष झाला. हुकूमाची पडताळणी करुन गावडे यांनी पिंपळवाडीजवळ वस्ती करावी, अवसरीची पोलिस पाटीलकी हिंगे यांना तर मुलकी पाटीलकी गावडे यांना देण्यात आली. स्वातंत्र्यानंतर मुलकी पाटीलकी खालसा झाली. मात्र, हिंगे कुटुंबाकडे पोलिस पाटीलकी कायम राहीली.

 गावात हिंगे, चवरे, येलभर, शिंदे, गाडेकर, रोकडे, शेटे, चव्हाण, शहा, फल्ले, चव्हाण, जाधव, गायकवाड, टाव्हरे, इनामदार, जारकड, मंडलिक, गावडे, वेल्हेकर, वाघमारे, दळवी … आदी आडनावे असलेले कुटुंबिय आहेत. पूर्वी गावडेवाडी आणि टाव्हेरवाडी अवसरी बुद्रुकची ग्रामपंचायत मिळून होती. परंतु लोकसंख्या वाढल्यानंतर प्रशासनाच्या सोईसाठी गावडेवाडी आणि टाव्हेरवाडी या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात आल्या. अवसरी बुद्रुकची लोकसंख्या सुमारे ४ हजार ३९४ आहे. गावाला साजेशी  वेशअसून, रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठ वसलेली आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून बाजारपेठेतील सर्व दृश्य दिसते.