Cultural & Entertainment

धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सवः ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्सव – चैत्र महिना सुरु होण्यापूर्वी जवळजवळ शेतीची कामे संपत आलेली असतात. त्यामुळे शेतकरी कामातून थोडे निवांत झालेले असतात. त्यावेळी सर्वाना यात्रेचे वेध लागलेले असतात. यात्रेचे कार्यक्रम आणि वर्गणीबद्दल गावकरयांची बैठक म्हणजे यात्रेची नांदी असते. यात्रा जवळ आली की लहानांपासून मोठ्यापर्यंतच्या उत्साहाला उधाण येते. बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले लोक, नातेवाईक या निमित्ताने एकत्र येतात. यात्रेत मांडव डहाळे, बैलगाड्यांच्या शर्यती, कुस्त्यांचा जंगी आखाडा, तमाशा अशी कार्यक्रमांची रेलचेल असते. 

चैत्र शुध्द पंचमीला गावची यात्रा. ही यात्रा म्हणजे जणू गावची दिवाळीच. प्रत्यक्षात यात्रेचा दिवस उजाडतो त्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर आंघोळ करुन गावात जातात. सकाळी गावातील बाजारपेठेतून सजविलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे बाजारपेठेत स्थानिक ग्रामस्थ आणि पाहुण्यांची अलोट गर्दी असते. बैलांच्या शिंगांना रंग लावून, बेगडे लावून सजविले जाते. पूर्वीच्या काळी ढोल-लेझीम, वाजंत्रीच्या ठेक्याच्या तालावर ही मिरवणूक निघत होती. बदलत्या काळात आता त्यांची जागा डिजे साऊंड सिस्टिमने घेतली आहे. डीजेतील गाण्यांच्या तालावर तरुण मुले नाचत असतात. बैलाच्या अंगावर गुलाल, भंडारा उधळत ‘भैरवनाथाच्या चांगभल्या’च्या गजरात मिरवणूक बाजारपेठेतून बाहेर पडते. मिरवणूक सुरु असताना ग्रामदेवतेच्या देवळात भजनाचा, देवाला नैवेद्य दाखविण्याचा आणि गुळशेरणी प्रसाद वाटण्याचा कार्यक्रमही सुरु असतो. मिरवणूकीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण घरी जातात. घरी जाऊन यात्रेच्या निमित्ताने केलेल्या गोडधोड जेवणावर ताव मारुन थोडावेळ विश्रांती घेतात. तोच यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. या चित्तथरारक बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी चैत्र महिन्यातील तळपत्या उन्हात गावकरी आणि पाहुणे मंडळींची पाऊले घाटाकडे वळत असतात.

भिर्र … भिर्र… अशी हाळी देताच विजेच्या चपळाईने धावणारी खिल्लारी बैलांची खोडं …पाठोपाठ … उधळलेल्या पिवळाधम्मक भंडरयातून दुतर्फा गर्दीची टाळ्या वाजत  उसळणारी लाट आणि पापणी लवते न लवते तोच घाट पार केल्याचे निशाण पडताच अनाऊन्सने सेकंद १३.२ चा केलेला पुकारा … हा बैलगाडीच्या शर्यतीचा थरार.बैलगाडीने  किती कमी सेकंदात घाट पूर्ण केला यावर बैलगाडीचा क्रमांक ठरतो. सेकंदांवरच गाड्यांचे एक ते पाच नंबर काढले जातात. बैलगाडीच्या शर्यतीसाठी तब्बल एक लाख  रुपयांपर्यतची बक्षिसे, सोन्याचे कडे, अंगठ्या आणि अन्य आकर्षक इनाम ठेवली जातात. सायंकाळी बैलगाडा मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण केले जाते.
रात्री गावातून देवाच्या पालखीचे म्हणजे छबिन्याची जंगी मिरवणूक काढली जाते. या पालखीपुढे गावातील सर्व प्रासादिक मंडळी भजन सादर करतात. पालखीपुढे शोभेच्या दारुची आतषबाजी केली जाते. यात्रेच्या दुसरया दिवशी सकाळी भारुडाचा कार्यक्रम असतो. दुपारनंतर कुस्त्यांच्या आखाड्याला सुरुवात होते. वर्षभर तालीममध्ये मेहनत करुन शरीर कमावलेल्या पहिलवानांसाठी कुस्त्यांचा आखाडा म्हणजे वार्षिक परीक्ष असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे ५१ रुपयांपासून ते ११ ह्जार रुपयांपर्यंत इनाम असते. चांगल्या पैलवानाला त्याच्या योग्यतेचा पैलवान देण्यासाठी त्याला आखाड्यातून गावातील ज्येष्ठ व्यक्ती ‘याला जोड मिळेल का?’ अशी हालगी देत फिरत असते. आखाड्यात प्रत्येक पैलवान जिद्दीने कुस्ती लढवित योग्यतेचे बक्षिस मिळवत असतो. यात्रेच्या निमित्ताने विविध वस्तूंची विक्री करणारे दुकानदार आलेले असतात. त्यामध्ये ऊसाच्या रसाची दुकाने, हॉटेल्स, पाळणावाले, बांगड्या विकणारे, शेव रेवडी विक्रेते, भेळवाले, लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तूंची विक्री करणारे दुकानदार मोठ्या प्रमाणात आलेले असतात. या दुकानदारांकडे उन्हे कलू लागली की खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली असते. यात्रेतील गरमागरम भजीची आणि जिलबीची चव न्यारीच असते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर गावातील सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांची पावले तमाशाच्या फडाकडे वळतात. तमाशाच्या रंगमंचावरील पडदा बाजूला होतो. आणि सुरु होतो ढोलकीचा खणखणाट! तोच प्रेक्षकांमधून शिट्ट्यांचा मारा सुरु होतो आणि वर्षभर ज्या तमाशाची आतुरतेने वाट पाहिली जाते त्या तमाशाला सुरुवात होते. गण- गवळण, मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम, वगनाट्य यातून प्रेक्षकांची करमणूक आणि जनजागृती केली जाते. लहानांपासून वृध्दांपर्यंत जीची वर्षभर वाट पहातात ती यात्रा संपते. त्यानंतर यात्रेच्या आठवणी जागवत पुढील यात्रेच्या प्रतिक्षेत सर्वजण असतात.
गणेशोत्सव हा सर्वांना आनंदाची पर्वणी देणारा उत्सव! गावात भैरवनाथ मित्र मंडळ आणि व्यापारी मंडळ गणेशोत्सवात आघाडीवर असते. ऐतिहासिक, सामाजिक प्रबोधन करणारे देखावे आणि चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. त्यात प्रवचन, पारायण, कीर्तन यांचा समावेश असतो. गोपाळकाल्याला गावात चार दहिहंडी बांधलेल्या असतात. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात तरुण मनोरे रचून दहिहंडी फोडतात. त्यानंतर संपूर्ण गावाला अन्न प्रसादाचे वाटप केले जाते. दत्तजयंतीनिमित्त भजन स्पर्धा, बैलपोळा, आनंदाने साजरा केला जातो. वर्षभर ज्याच्य जीवावर बळीराजा शेती करत असतो त्या बैलांना सजवून बैल पोळ्याच्या दिवशी वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. रामजन्मोत्सव, हनुमान जयंती, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मोहरम, महाशिवरात्री हे सर्वच जाती धर्माचे सण – उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी होतात.
गावात धर्मराज देवाची छोटी यात्रा भरते. या यात्रेत गावातील कुंभारांनी बनविलेले मातीचे माठ अणि रांजण विक्रीसाठी ठेवले असतात. या मातीच्या माठांना पंचक्रोशीतील गावातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे याला काहीजण ‘मडक्याची यात्रा’ ही म्हणतात.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या राष्ट्रीय सणांन शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कसरतीचे प्रयोग करत असतात.