Persnalities

राजकीय व्यक्तिमत्वे:
कै. नारायणशेठ महादेवराव हिंगे पाटीलः

सामाजिक व्यक्तिमत्वेः
युवराज शांतीलाल शहाः  यशस्वी उद्योजक आणि मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. पुण्यात जैन विद्यार्थीनींसाठी असलेल्या वसतिगृहाची जबाबदारी ते अत्यंत उत्कृष्ट पध्द्तीने पार पाडत आहेत.

भाऊसाहेब पंढरीनाथ काळेः कृषी विभागात कार्यरत आहेत. अमेरिकेची फेलोशीप त्यांना मिळाली आहे.

जयसिंगराव शिंदेः मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत.

स्वातंत्र्य सैनिकः

१) दौलत उत्तमचंद शहा
२) प्रल्हाद भगवंतराव होनराव

वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्वे:
वसंत अवसरीकर तमाशा…. मराठी मातीचा शंभर नंबरी अस्सल सोनं असलेली महाराष्ट्राची लोककला! त्यातील सोंगाड्या हे तर सर्वांच्याच आवडीचे पात्र. दिवसभर काबाडकष्ठ करून दमलेल्या, शीणलेल्या हजारो लोकांना आपले दुःख, कटकटी, ताणतणाव काही काळापुरता हलका करुन सद्य राजकीय, सामाजिक स्थितीवर मार्मीक भाष्य करुन सर्वांना हसविणारा सोंगाड्या म्हणजे तमाशातील एक अविभाज्य घटक! या सोंगाड्या परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे वसंत अवसरीकर!  वसंत कुशाबा रोकडे हे त्यांचे पूर्ण नाव; पण गावाशी नाळ जुळलेली असल्यामुळे आपल्याबरोबरच गावाचेही नाव गाजविण्यासाठी वसंतराव यांनी रोकडे आडनावऐवजी गावाचं नाव अवसरीकर जोडलं. अन अवघ्या महाराष्ट्रात ते वसंत अवसरीकर या नावानेच परिचित झाले. वसंतरावांचे आजोबा शंकरराव अवसरीकर हे प्रसिध्द ढोलकीपटू. त्या काळात शंकरराव अवसरीकर  च्यासह गुणाजी मास्तर नारायणगावकर हा तमाशाचा फड महाराष्ट्रभर गाजत होता. त्यात शंकररावांचे संभाजी, रेवजी हे दोघे भाऊ फडाचे आधारस्तंभ होते. त्यानंतर कुशाबा आणि गेनबा यांनी ही फडाची जबाबदारी सांभाळली. प्रसिध्द ढोलकीपटू कुशाबा यांचे वसंत हे चिरंजीव! या परंपरेमुळे अवसरीला कलावंताचे गाव म्हणून ओळखले जाते.  वयाच्या सातव्या वर्षापासून वसंता घरच्या तमाशफडात काम करु लागला. लहानपणी राजा हरिश्चंद्राच्या मुलगा रोहिदास, रजवाडी वगात युवराज अशी कामे त्यांनी केली. अवसरी गावातील त्यांच्या घरात तमशाचे सर्व साहित्य ठेवले जात होते. पण दुर्दैवाने घराला लागलेल्या आगीत हे सर्व साहित्या खाक झाले. तरीही न खचता नव्या उमेदीने वसंतराव यांनी मुंबईचा रस्ता धरला. खरया अर्थी वसंतरावांच्या सोंगाडेपणाला घुमारे फुटलं ते गाढवाचं लग्न या वगनाट्यातील दिवाणजीच्या भूमिकेतील रुपाने. संगीत नाटक अकादमी विजेते वगसम्राट कै. दादू इंदुरीकर यांनी गाढवाचं लग्नाद्वारे साकार केलेला सावळा कुंभार आणि वसंतरावांचा दिवाणजी पाहण्यासाठी केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी रसिकही नाट्यगृहात गर्दी करत होते.दिवाणजीची भूमिका म्हणजे वसंत अवसरीकर असे जणू समीकरणच तयार झाले होते. प्रकाश इनामदार, मोहन जोशी यांच्यासारख्या कसलेल्या कलावंतांबरोबर त्यांनी काम केले.  दादू इंदुरीकर, निळु फुले, राज नगरकर, वसंत शिंदे, लीला गांधी, मधु कांबीकर, मोहन जोशी, प्रकाश इनामदार अशा अनेक ज्येष्ठ कलावंतासोबत लोकनाट्ये, वगनाट्ये, नाटक आणि चित्रपटातून वसंतरावांनी बहुआयामी विनोदी अभिनय शैलीचे दर्शन घडविले. ‘कथा अकलेच्या कांद्याची’मधील येंदू, ‘लाडाची मैना’मधील ‘हवालदार’, गावची जत्रा भानगडी सतरा’ मधील दिवाणजी, ‘राजकारण गेलं चुलीत’ मधील कार्यकर्ता, या त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे विस्मरण कधीच होणे शक्य नाही.  ‘मिश्किली’, ‘भोकरवाडीची चावडी’ यासारख्या दूरदर्शन मालिका, ‘बाईसाहेब’, एक होता विदूषक’, ‘निघाले गलगले’ या चित्रपटांतून आपले अभिनय सामर्थ्याची जाणीव त्यांनी महाराष्ट्राला करुन दिली. त्याचबरोबर ‘बाई बिलंदर नवरा कलंदर’, ‘पाटील बायको सांभाळा’, ‘कशी सांभाळू दौलत लाखाची’, ‘सत्याचा वाली पंजा’, ‘बदाम राणी चावट गुलाम’, ‘सखी माझी लावणी’, ‘सखा माझा मंत्री झाला’, ‘आली रंगात राणी’, यात त्यांनी काम केलं. पिंपरी-चिंचवडच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेने त्यांचा तीन वेळासत्कार केला. क्रांती थिएटर सातारा यांचा लोकशाहीर भाऊ पक्कड स्मृती पुरस्कार, बॅंक कर्मचारी संघ, लोकराजा राजर्षी शाहू महाराज फाऊंडेशन, यशश्री करंडक रत्नागिरी, पुणे महानगरपालिकेतर्फे वसंत अवसरीकर यांना गौरविण्यात आले. राज्य सरकारच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत दिवाणीच्य भूमीकेसाठी त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकाविला. राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा २००६ चा विठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवनगौरव पुरस्कार वसंतराव यांना मिळाला.  वसंतरावांचा हजरजबाबी विनोदात एक प्रकारची निरागसता आणि भाबडेपणा आहे. किंबहुना ते त्यांच्या सोंगाडेपणाचे सामर्थ्य आहे. तमाशाचा पारंपारिक बोर्ड, लोकनाट्याचा रंगमय आणि रुपेरी पडदा यांची तब्बल ५० वर्षे अविरत सेवा केली. सोंगाड्या म्हणजे हसविणारे पात्र असा सर्वांचा समज. मात्र, त्यासाठी चौफेर वाचन, निरीक्षणशक्ती, बहुश्रुतपणा आणि हजरजबाबीपणा आवश्यक असतो. आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करुन रसिकांना हसविण्यात समाधान मानणारया या सोंगाड्याला समस्त गावकरयांकडून सलाम!

संजू हिंगेः व्यावसायिक छायाचित्रकार! २० वर्षांच्या कारकिर्दीत भरीव यश मिळविले. ताज ग्रुप्स ऑफ हॉटेल्स, जैन ग्रुप ऑफ कंपनी, प्रगती आर्ट प्रिंटर्स, हिंदुस्तान पेट्रोलियम, विको, पेप्सी, अल् कबीर, टायटन वॉचेस, मॉजिंसिस् जिंदाल, महिंद्रा ऍंड महिंद्रा, टाटा टॉवर्स, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ या कंपन्यासाठी औद्योगिक, व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम केले.  व्यावसायिक छायाचित्रण, जाहिराती या क्षेत्रामधील त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. छायाचित्रणाच्या छंदातून त्यांनी ‘ बेकॉने वे पब्लिकेशन’ ही संस्था स्थापन केली. छायाचित्रणाबरोबरच त्यंनी ‘डायनामिक्स प्रॉडक्शन’ ही ऍनिमेशन चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करुन या क्षेत्रात पदार्पण केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत बायोफोटोग्राफी त्यांनी तयार करुन प्रकाशित केली आहे. त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्वाने गावचा लौकिक वाढला आहे.